Jivanache Ankaganit


डोक्यावरचं कर्जाचं ओझं जड झालं की आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य संपवणं , हा अलीकडे सोपा इलाज होऊ लागला आहे. पण आयुष्य मौल्यवान असतं आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही. ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे ,संपवण्यापेक्षा.
..........
गेल्या आठवड्यात एका बातमीने सगळं मुंबई शहर हादरून गेलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कर्जबाजारी बापानं मुलांचा खून केला आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. दोन दिवसांनी घरातून कुजलेले मृतदेह बाहेर काढावे लागले!

खरंतर अशा बातम्या महिन्या दोन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या शहरातून येत असतात. तपशील बदलतात ... कहाणी एकच असते. कर्जात आकंठ बुडालेलं कुटुंब. त्यातून मार्ग न निघाल्याने बायको-मुलांची हत्या करून स्वतःला संपवणारा घरातला मध्यमवयाचा कर्ता पुरुष ... चटका लावणारे हे प्रसंग या देशातलं बदलतं आर्थिक आणि सामाजिक वास्तव दाखवतात. त्याच्या मुळाचा शोध घेताना थेट आपलं आर्थिक धोरण खुलं झालं तिथपर्यंत मागे पोहचावं लागतं. वीस वर्षांपूर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यांना दारं खुली झाली. आयटी आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत जेमतेम विशी पार केलेली मुलं लाखांच्या आकड्यात पॅकेज घेऊ लागली ...पैशांसोबत खर्च करण्याचे मार्गही आले. एअर कंडिशनरच्या गारव्यात खरेदीचं सुख देणाऱ्या अवाढव्य चकचकीत मॉल्समधून अलिबाबाची गुहा सापडावी तशी गर्दी दिसू लागली. ' ब्रँडेड ' वस्तूंचा जमाना आला. शर्टपासून बुटांपर्यंत आणि पर्सपासून दागिन्यांपर्यंत ब्रँडचा शिक्का स्टेट्स सिंबॉल झाला. त्याच वेळी परदेशी बँकाही इथे आल्या , ते इथल्या मध्यमवर्गाच्या खर्च करायच्या सवयी मुळातून बदलून टाकण्याचा विडा उचलून. मध्यमवर्गाला या बँकांनी प्लॅस्टिक मनीची सवय लावली. दर महिन्याला बँकेच्या रांगेत उभं राहून पगार काढणारा आणि तो महिना संपेपर्यंत निगुतीने पुरवणारा नोकरदार दिसेनासा झाला. बँकेच्या अकाऊंटवर पैसा नसला तरी तो खर्च करता येतो , ही जादू भुलवू लागली. खिशात एक रुपया नसतानाही काचेच्या पलीकडे दिसणारी कोणतीही वस्तू तुमची होऊ शकते या भूलभुलय्यात तो अडकत गेला ...

स्कूटरसाठी वर्षानुवर्षं नंबर लावून नंतर ती घरी आल्यावर आनंदोत्सव करणाऱ्या पिढीला नोकरीनंतर सहा महिन्यात लेकाने दारात उभी केलेल्या चारचाकीचं कोडं उमगेना. निवृत्तीनंतर जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर प्राव्हिडंड फंड खर्ची घालत बंगला बांधून ' सार्थक ' वगैरे नाव देणाऱ्या पिढीच्या मुलांचे संसार स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट्समध्ये सुरू होऊ लागले. नातवंडं थेट इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळेत जाऊ लागली. घर , गाडी , टीव्ही , फ्रीज , एसी... अगदी परदेश टूरही कर्जाऊ मिळू लागली! भविष्यात कमवायच्या पैशातून वर्तमान खरेदी करता येत असेल तर का नाही ? ही मानसिकता.

मध्यमवर्ग म्हणजे काटेकोर नियोजन , काटकसर , हजारदा पारख करून केलेला व्यवहार वगैरे ...' समीकरण मोडून तोडून पडलं. हातात येणारा पैसा , जबाबदाऱ्या , अचानक येणारे खर्च , भविष्यासाठीची तरतूद या गोष्टींचा विचार दुय्यम ठरला. पैसा आहे आयुष्य जगून घेऊ ही मानसिकता वाढली. गरज असो वा नसो खरेदीचं व्यसन लागलं. महिन्याला आऊट ऑफ फॅशन होणारे कपडे.सहा महिन्यांनी आऊटडेटेड होणारा मोबाइल , दोन वर्षांत जुन्या होणाऱ्या गाड्या आणि पाच वर्षांत कमी पडणारं घर ... खर्चाचे आकडे वाढत जातात , मात्र त्या वेगाने येणारा पैसा वाढत नाही तेव्हा गणित बिघडतं. हप्ते चुकेपर्यंत प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या बँकांची भाषा बदलते आणि कर्जाचं ओझं जाणवू लागतं.

मागच्या पिढीनं बहुतांश सरकारी नोकऱ्या केल्या. फार तर बँकांतून. आताच्या नोकऱ्या कंत्राटी. एका रात्रीत आम्ही तुम्हाला घरी बसवू , असं नोकरीच्या पहिल्या दिवशी लिहून घेणाऱ्या. अशा स्थितीत आवश्यक अनावश्यक गरजांसाठी काढलेलं कर्ज एका क्षणात काळोखं भविष्य घेऊन अंगावर कोसळतं. छोट्या व्यवसायांचंही तेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नुसतं टॅलेंट आणि जीवतोड मेहनत पुरत नाही. एखादा निर्णय चुकतो आणि सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं.

त्यात आपल्याकडे कर्त्या पुरुषावर कुटुंब आणि समाजव्यवस्थनं अपेक्षांचं भलं मोठं गाठोडं लादलेलं. हे कर्तेपणाचं ओझं वाहता वाहता तो दबून जातो! बाप , नवरा , भाऊ , मुलगा या नात्यांत पुरुषाला ' कर्तेपण ' सिद्ध करावंच लागतं. हे कंपल्शन आपल्या व्यवस्थेनं त्याच्यावर लादलंय. त्याला पराभवाचा , मागे पडण्याचा , हरण्याचा आणि रडण्याचा ऑप्शन नाही. त्याची कुवत ,इच्छा , आवड असो वा नसो , त्याला धावावं लागतंच ... या तणावात सतत वावरल्यानं नैराश्य घेरू लागतं. आपण मागे पडतोय ,अपेक्षांना पुरे पडू शकत नाही , हा त्याला मोठा पराभव वाटू लागतो. अगदी पत्नीजवळही हे व्यक्त करण्याचं धारिष्ट्य होत नाही. असा माणूस आतून कोसळत राहतो. त्याच्या चेहऱ्यावरचा ' ऑल इज वेल ' चा मुखवटा आपल्या माणसांनाही ओळखता येत नाही. यातून मग कधी व्यसनं , कधी गुन्हेगारी सुरू होते. या सगळ्याचं टोक... आत्महत्या.

भविष्यात आर्थिक धोरणं अशीच राहतील आणि ही असुरक्षितताही. कदाचित पुढच्या काळात ती आणखी वाढत जाईल. त्यालासामोरं कसं जायचं हा कळीचा मुद्दा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळाबरोबर बदलण्याचं भान हवं. व्यावसायिक कौशल्यं आणि क्षमता याबाबत सतत अपडेट असायला हवं , तरच स्पर्धेला पुरं पडता येईल. येत्या दहा वर्षात आजवर कधीही झाली नव्हती ,एवढी माणसं निवृत्त होणार असल्याचं आकडेवारी सांगते. निवृत्त होणाऱ्यांपैकी कितीजणांना निवृत्तीवेतनाचं सुख असेल , हासंशोधनाचा विषय. यापुढे निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या आर्थिक नियोजनाचं ओझंही आहेच. त्यामुळे बचत तर हवीच. त्यातही लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म असं नियोजनही हवं. गरजा आणि उत्पन्नाचं गणित पक्क असणं महत्त्वाचं. कोणती लाइफस्टाइल आपल्याला परवडू शकते , याचं भान हवं. गरज पडेल तेव्हा ती विनासंकोच बदलण्याची तयारीही हवी. त्यात मित्रमंडळी आणिनातेवाईकांशी अनावश्यक स्पर्धा टळेल आणि त्यातून येणारे ताणही. आर्थिक ताणतणावात सर्वात आधी कुटुंबाला विश्वासात घेणं महत्त्वाचं. मित्रांशी मोकळेपणाने बोलण्यातून कदाचित मार्ग निघू शकतात. त्यांच्या मदतीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधता येतील.

कर्जांचे हप्ते डोईजड होऊ लागले की सर्वात आधी बँकांशी बोलणं सर्वाधिक महत्त्वाचं. त्या बहुतेक वेळा सहकार्याचा हात पुढे करतात , मार्गही काढतात. मोठ्या व्याजदराकडून छोट्या व्याजदराकडे जाण्याचे पर्याय आहेत का ते तपासावेत. आजकालकर्जफेडीच्या प्रकरणांत सल्ला देणाऱ्या संस्था असतात , त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेता येईल.

सगळ्यात महत्त्वाचा स्वतःवरचा विश्वास. कितीही मोठं संकट आलं , तरी त्यातून बाहेर पडता येतं ; हा विश्वास महत्त्वाचा. तो जेवढा मजबूत तेवढे मार्ग अधिक.

आयुष्य मौल्यवान असतं , आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही ... ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे , संपवण्यापेक्षा.

ref: Yogesh Mendjogi through gmail

Comments

Popular posts from this blog

माधुर्य रस भाव

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू