महिलादिनी मला घडलेला साक्षात्कार
महिलादिनी मला घडलेला साक्षात्कार: भाऊ तोरसेकर
त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ८ मार्चला महिलादिन होता. सगळीकडे महिलांचे गुणगान चालू होते. वाहिन्यांपासून वृत्तपत्रांपर्यंत सर्वत्र महिलांवर कौतुकाच्या शब्दांचा वर्षाव चालू होता. पण मी मात्र त्यात सहभागी नव्हतो. म्हणूनच माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी फ़ेसबुकच्या भिंतीवर काही ओळी लिहिल्या होत्या.
ज्याच्या आयुष्यात महिलांच्या कृपेशिवाय कुठला दिवस उगवतो वा मावळतो, त्यांच्यासाठी महिलादिन असू शकतो. माझ्या जीवनात तरी असा दिवस अजून उजाडलाच नाही. जन्माला घालण्याच्या कृपेपासून कुठल्या ना कुठल्या रुपातल्या स्त्रीनेच संभाळ केला. म्हणून माझ्यासाठी प्रत्येक दिवसच महिलादिन असतो. तर कुठला एक दिवस साजरा करू? ज्यांच्या शुभेच्छा व सदिच्छांवरच जगलो व जगतो, त्यांना द्यायला उधारीच्या शुभेच्छा आणायच्या कुठून? ज्या दिवशी त्या दिवाळखोरीतून आणि ऋणातून मुक्त होऊ शकेन तो दिवस माझ्यासाठी स्वतंत्रपणे काही साजरे करायचा दिवस असेल मित्रांनो. पण विद्यमान निसर्गनियमात स्त्रीपासून स्वतंत्र स्वयंभू माणुस होणे या जन्मात तरी अशक्य वाटते.
अनेक मित्रांना हा उतारा खुप आवडला. कोणी त्यावर आपल्या दिलखुलास प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. कुणाला ते वैचारिक वाटले, कुणाला भारदस्त तर कुणाला प्रामाणिक निवेदन वाटले. पण ती मनातली वेदना होती. ती वाचणार्यांपर्यंत कितपत पोहोचली याचीच शंका आली. शब्दांचे खुजेपण व वांझोटेपण त्या दिवशी प्रथम जाणवले. कारण मृत्यूची घरघर लागलेल्या आईला रुग्णशय्येवर बघतच गेले काही दिवस मी काढलेले होते. जिने नऊ महिने गर्भात आणि पुढ्ली तीनचार वर्षे तरी जीवापाड जपले, जोपासले; तिच्या त्या जीवघेण्या यातना बघत बसण्यापलिकडे मी काहीच करू शकत नाही, अशी हतबलता त्या महिलादिनी माझ्या वाट्याला आलेली होती. माझ्या जन्मापुर्वीपासूनच संपर्कात आलेली ही पहिली महिला, अखेरच्या घटका मोजत होती आणि तिला त्यातून दिलासा मिळावा; असेही काही करणे माझ्या हाती नव्हते. मग त्या शुभेच्छांना, सदिच्छांना काय अर्थ उरतो? इथे समोर रुग्णशय्येवर माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची महिला वेदनांनी व्याकुळ होऊन, ग्लानी येऊन पडली आहे, तिला शुभेच्छा काही उताराही देऊ शकत नसतील, तर तो शब्द किती पोकळ व निरर्थक असतो ना? त्याची जाणिव मनाला पोखरत असताना हे निवेदन लिहून काढले होते. ती व्यथा तिच्या शारिरीक वेदनेपेक्षा अधिक यातनामय होती, माझ्यासाठी. शब्दांच्या खोटेपणाच्या त्या विदारक अनुभवातून जात असतानाची अनुभूती अतिशय दाहक होती, पण ज्या माध्यमातून मन मोकळे केले, तेसुद्धा शब्दच होते ना? ते तरी माझ्या वाचक मित्रांना कितपत सत्य सांगू शकणार होते? ती वेदना मनातल्या मनात भोगण्यापलिकडे अन्य पर्यायच नव्हता. अशी माझी आई सुलभा वसंत तोरसेकर यावर्षीच्या महिलादिनी हे जग सोडून गेली.
गेले सात महिने ती माझ्या वाट्याला आली होती. रुग्णाईत होऊनच ती माझ्याकडे वास्तव्याला आली. तिला उठताबसता येत नव्हते. परावलंबीत्वाच्या यातना तिला अधिक व्हायच्या. पण मृत्यूशी तिची चाललेली झुंज बघताना, मी कसाविस झालो होतो. कारण ही सगळी अनुभूतीच अनाकलनीय होती. मन आणि वास्तवाचा जबरदस्त संघर्ष चालू होता. वैद्यकशास्त्र तिच्यासाठी काही करू शकत नव्हते. निकामी होत चाललेले शरीर आणि त्यातही जगण्याची मोठी आसक्ती, अशा कचाट्यात सापडलेली ती जन्मदाती बघणे माझ्या नशीबी आले होते. आणि तिच्या शारिरीक यातनांपेक्षा माझ्या मानसिक यातना अधिक असह्य होत्या. कारण काय असेल? जिने नऊ महिने गर्भात वाढवले, जन्म देण्यासाठी बिनतक्रार बोजा उचलला, तिच्या मरणाची प्रतिक्षा करणे माझ्या नशीबी आले होते. किती भयंकर विरोधाभास आहे बघा. माझ्या जन्माच्या प्रतिक्षेत तिने् वेदना सोसल्या आणि तिच्या मरणाची प्रतिक्षा करत मला मागले सात महिने काढावे लागले. पण आता असे वाटते तेही वाया जाऊ दिले नाहीत आईने. या सात महिन्यात खुप काही शिकवले तिने. गेल्या बेचाळीस वर्षात पत्रकारिता करताना हजारो लेख लिहिले, त्यात सहजगत्या वापरलेले अनेक शब्द व वाक्यांसह म्हणींचे अर्थ या सात महिन्यात प्रथमच उलगडत गेले. जीव नकोसा होणे, जीव भांड्यात पडणे, देह ठेवणे, आसक्ती असे कितीतरी शब्द प्रथमच आपल्या मुळच्या अर्थासह भेटायला आणले तिने. कमरेखालचा सगळा देह निकामी झाला असतानाही; आईच्या जगण्याची दुर्दम्य इच्छा मला थक्क करून गेली. तेव्हा तिच्याशी मी संवाद करत होतो. परावलंबी झाल्याची वेदना ती बोलून दाखवत होती. पण जगाचा निरोप घेण्याची इच्छा तिच्या बोलण्यात कुठे आढळत नव्हती. असे काही सुखाचे दिवस तिने बघितले नव्हते, की जगण्याची इतकी आसक्ती तिला असावी. मग ती कशासाठी झुंजत होती? देहधर्म करता येत नव्हता, की साधे पाणी आपले पिता येत नव्हते. मग आसक्ती कशाला असावी? मृत्यूला शरण जाण्याची इच्छा का नसावी? परिस्थिती अनुकुल होण्याची कुठलीही शक्यता वयाच्या ९६ व्या वर्षी नसताना, जगण्याची झुंज कशासाठी?
जेव्हा ती मृत्यूच्या स्वाधीन झाली त्यानंतर तिच्या निर्जीव चेहर्यावर समाधान होते, त्याने मी अधिकच विचलीत झालो. सात महिने माझ्यासमोर असह्य यातना सोसलेला हा जीव; इतका समाधानी मनाने जगाचा निरोप कसा घेऊ शकला? कपाळावर आठी नव्हती, की डोळे भकास उघडे नव्हते. जग सोडताना कसले समाधान तिच्या चेहर्यावर असावे; याचा पुढल्या चारपाच तास मी विचार करत होतो. उत्तरे शोधत होतो. मग एक गोष्ट जाणवली, ती तीन पिढ्या मागची होती. आजच्या काळाचे संदर्भ तिला माहित होते. पण ती तिच्या पिढीच्या काळातून नव्या युगात येऊच शकलेली नव्हती. ज्या युगात अपेक्षा खुपच कमी असायच्या आणि इवल्या अपेक्षा पुर्ण झाल्या तरी माणसे सुखी असायची. आयुष्यात समाधान मिळवायचे आहे, इतके साधेसुधे उद्दीष्ट उराशी बाळगून जगणार्यांची ती प्रतिनिधी होती. आम्ही जीवनापासून किती दुरावलोय आणि आजची पिढी कुठे फ़सली आहे; त्याचे प्रात्यक्षिक आपल्या मुलाला देण्यासाठीच तिने शेवटच्या काही महिन्यात इतक्या यातना सोसून झुंज दिली; असेच आता वाटते. कुठल्या ना कुठल्या विवंचनेत मग्न होऊन जगणेच विसरलेल्या मुले व नातवंडांना ती काही शिकवू समजावू बघत असेल का? किती प्रश्न व विचार माझ्यासाठी मागे ठेवून गेली. समाधान त्याचेच असेल का? परावलंबी होऊन रुग्णशय्येवर पडली असतानाही तो कालखंड तिने कारणी लावला; म्हणून समाधानी असेल का? प्रत्येक आई अशीच असते. मग ती सुशिक्षित असो अशिक्षित असो, गरीब-श्रीमंत, चिडचिडी प्रेमळ कशीही असो. ती लेकरावरची ममता अखेरच्या क्षणापर्यंत सोडू शकत नाही.
तिने माझे बालपण काढले तेव्हा कर्तव्य भावनेने मीही तिचे आजारपण अखेरच्या काळात काढले. पण दोन्हीमध्ये प्रचंड फ़रक आहे. मी कर्तव्य म्हणून पार पाडले, तिने ममतेने सर्वकाही केले होते. मी देणे फ़ेडल्यासारखी सेवा केली. तिने गुंतवणूक म्हणूनही नव्हे तर आस्था म्हणून सर्वकाही केलेले होते. म्हणूनच मी त्याला न फ़िटणारे कर्ज मानतो. आणि अशी माझीच आई होती असे नाही. मी सगळ्याच आयांमध्ये तेच बघितले आहे. आई हे स्त्रीचे सर्वात विलोभनीय रुप आहे. निरपेक्ष, निर्व्याज, पारदर्शक आस्था. आणि अगदी कुठल्याही रुपातली स्त्री तशीच असते. ती विविध रुपात पुरूषाच्या आयुष्यात येत असली तरी त्या प्रत्येक आवडत्या पुरुषाला ती मुलाप्रमाणेच वागवते. स्त्री ही उपजतच आई असते. पुरूष हा उपजतच मुल असतो. कितीही वय वाढले म्हणून पुरूष प्रौढ होत नाही आणि वयाने कितीही लहान असली म्हणून स्त्रीचे आईपण लपत नाही. ती स्त्री आपण ओळखू शकलो तरच महिलादिन साजरा करता येईल. पुरूषातल्या नरवृत्तीचा लोप झाला तर त्याला मादीपलिकडली स्त्री सापडू शकेल. तेव्हाच मग तो खुल्या दिलाने महिलेचा सन्मान करू शकेल. मादीची जननक्षमता वापरून वंशाला पुढे नेण्य़ाचे कर्तव्य पार पाडणे, ही स्त्रीच्या जीवनातली औपचारिकता असते. तेवढा भाग सोडला तर सदासर्वकाळ ती स्त्री असते. तेच तिचे खरे रूप असते. ज्याची उदात्तता, औदार्य, संयम, ममता, समंजसपणा, सहनशीलता, संवेदनशीलता, आस्था, पुरूषामध्ये क्वचितच असतात आणि त्याच त्रुटीच्या न्युनगंडाने पछाडलेल्या माणसाला पुरूषी अहंकाराची बाधा होत असते. तो अहंकारच त्याला स्त्रीवर वर्चस्व प्रस्थापित करायला प्रवॄत्त करत असतो. त्याही वृत्तीला चुचकारून त्यातला माणुस जागवण्याची किमया स्त्रीपाशी असते, तिला म्हणूनच आई म्हणतात. ती जन्म देणारी असो किंवा बहीण, पत्नी असो. काही क्षणांचे अपवाद केल्यास स्त्रीचे अस्तित्व आईचेच असते. रुग्णशय्येवर परावालंबी होऊन पडलेली असतानाही माझ्या आईने दिलेला हा साक्षात्कार असावा. माझ्या सगळ्या बुद्धीवादाला पाळण्यात घालून जोजवताना तिने अखेरचा श्वास घेतला असे वाटते. शेवटी तू मुल आणि मीच आई आहे, हे सिद्ध केल्याचे अखेरचे समाधान तिच्या निर्जीव चेहर्यावर असेल का?

Ref: http://bhautorsekar.blogspot.de/2013/03/blog-post_11.html?utm_source=feedburner&utm_medium=email&utm_campaign=Feed:+blogspot/qIFJY+(%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F+%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A5%80)
Comments
Post a Comment