स्त्रियांना नक्की काय हवे असते?


हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते.

त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते. आणि जर वर्षानंतर त्याच्याकडे उत्तर नसेल तर त्याला फासावर चढवण्यात येणार होते.

प्रश्न होता : स्त्रियांना नक्की काय हवे असते?

अशा प्रश्नाने खरे तर अत्यंत बुद्धिमान माणूसही गोंधळून गेला असता. तरुण आर्थरसाठी तर याचे उत्तर शोधणे अशक्यप्राय होते; पण मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा उत्तर शोधणे जास्त सोयीस्कर होते, म्हणून त्याने राजाचे आव्हान स्वीकारले. तो त्याच्या राज्यात परतला आणि त्याने सर्वांना हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. राजकुमारी, राजगुरू, बुद्धिवंत आणि अगदी दरबारी विदूषकालादेखील त्याने हा प्रश्न विचारला. मात्र, एकाकडेही त्याचे समाधान होईल असे उत्तर नव्हते.

अनेक जणांनी त्याला म्हाता-या चेटकिणीचा सल्ला घेण्याचे सुचवले. आता फक्त तीच याचे उत्तर देऊ शकेल, असे ब-याच जणांचे मत होते. मात्र, चेटकिणीने त्यासाठी खूप मोठी किंमत मागितली असती.

असे होता होता शेवटी वर्षाचा अखेरचा दिवस उजाडला. आता आर्थरकडे चेटकिणीकडे जाऊन तिलाच या प्रश्नाचे उत्तर विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कबूल केले, मात्र, त्या आधी राजाला तिने मागितलेली किंमत चुकवण्याचे कबूल करावे लागणार होते.

त्या म्हाता-या चेटकिणीला सर लॅन्सलोटशी लग्न करायचे होते! सर लॅन्सलोट म्हणजे राजाच्या खास माणसांमधील सर्वात प्रामाणिक व्यक्ती आणि मुख्य म्हणजे राजा आर्थरचा सर्वात जिवलग मित्र! आर्थर नुसत्या कल्पनेनेच शहारला. चेटकीण पाठीला कुबड आलेली आणि सुरकुतलेल्या चेह-याची म्हातारी होती. तिच्या तोंडात एकच दात होता. तिच्या अंगाला असह्य वास येई. तिला चित्रविचित्र आवाज काढण्याचीदेखील सवय होती. आर्थर राजाने त्याच्या उभ्या आयुष्यात असा नमुना पाहिला नव्हता. त्याने आपल्या जिवलग मित्राच्या गळ्यात अशा चेटकिणीला बांधण्यास नकार दिला आणि जे काही परिणाम होतील ते भोगण्याची तयारी दर्शवली.

लॅन्सलोटला जेव्हा ही अट समजली, तेव्हा त्याने तडक राजा आर्थरला गाठले आणि त्याला समजावले की, आर्थरच्या आयुष्यापुढे हा त्याग काहीच नाही व तो चेटकिणीशी लग्न करायला तयार आहे. अखेरीस लग्नाची जाहीरपणे घोषणा केली गेली आणि आर्थरने चेटकिणीला प्रश्न विचारला :

‘तर, स्त्रियांना नेमके काय हवे असते?’

चेटकीण म्हणाली, ‘स्त्रियांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वत: घ्यायला हवे असतात.’

राज्यातल्या प्रत्येकाला जाणवले की, चेटकिणीने खरोखरच खूप समर्पक असे उत्तर दिले आहे आणि आता आपल्या राजाचा जीव वाचणार. तसेच झाले. शेजारच्या राजाने आर्थर राजाला मुक्त केले आणि लॅन्सलोट व चेटकिणीचे लग्न धूमधडाक्यात झाले.

मिलनाची घटिका जसजशी समीप येऊ लागली, तसा लॅन्सलोटने आता पुढे काय वाढून ठेवले आहे, असा विचार करत शयनकक्षात प्रवेश केला; पण शयनकक्षात पाऊल ठेवताच तो विस्मयचकित झाला. पलंगावर सुरकुतलेल्या, खंगलेल्या चेटकिणीच्या जागी एक सुंदर तरुण स्त्री बसली होती.

आश्चर्यचकित झालेल्या लॅन्सलोटने तिला घडला प्रकार विचारला. तेव्हा ती म्हणाली की, ती एका विद्रूप चेटकिणीच्या रूपात असतानादेखील लॅन्सलोट तिच्याशी आदराने आणि सौजन्याने वागला म्हणून यापुढे ती केवळ अर्धा दिवस विद्रूप चेटकिणीच्या रूपात वावरेल आणि उरलेला अर्धा दिवस सुंदर पत्नीच्या रूपात.

‘तुम्हाला कसे आवडेल?’ तिने विचारले, ‘दिवसा सुंदर असणे की रात्री?’

लॅन्सलोट क्षणभर अडखळला.

दिवसा त्याला एक सुंदर पत्नी मिळाली असती, जिच्यासोबत तो समारंभांमध्ये मिरवू शकला असता; पण घरी परतल्यावर मात्र एका म्हाता-या चेटकिणीसोबत त्याला रात्र काढावी लागली असती.

किंवा

जर ती दिवसभर म्हातारी चेटकीण बनून वावरली असती तर त्याला एका सुंदर स्त्रीसोबत रात्री घालवता येणार होत्या.

(जर तुम्ही पुरुष असाल तर) तुम्ही काय निवडले असते?

(जर तुम्ही स्त्री असाल तर) तुमच्या पतीने काय निवडले असते?

लॅन्सलोटने काय निवडले ते खाली दिलेलेच आहे; परंतु प्रथम तुमची निवड ठरवा आणि मग खाली पाहा.

सर लॅन्सलोट हुशार होता. त्याला चेटकिणीने राजा आर्थरला दिलेले उत्तर आठवले. त्याने उत्तर दिले की, त्या स्त्रीने स्वत:च ठरवावे की तिला कसे राहायचे आहे.

हे ऐकल्यावर ती म्हणाली की ती सर्वकाळ सुंदर राहील. कारण लॅन्सलोटने तिला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते.


(इंटरनेटवरूनअनुवाद : निकिता अपराज)

Comments

Popular posts from this blog

माधुर्य रस भाव

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू