महिलादिनी मला घडलेला साक्षात्कार
महिलादिनी मला घडलेला साक्षात्कार: भाऊ तोरसेकर त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ८ मार्चला महिलादिन होता. सगळीकडे महिलांचे गुणगान चालू होते. वाहिन्यांपासून वृत्तपत्रांपर्यंत सर्वत्र महिलांवर कौतुकाच्या शब्दांचा वर्षाव चालू होता. पण मी मात्र त्यात सहभागी नव्हतो. म्हणूनच माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी फ़ेसबुकच्या भिंतीवर काही ओळी लिहिल्या होत्या. ज्याच्या आयुष्यात महिलांच्या कृपेशिवाय कुठला दिवस उगवतो वा मावळतो, त्यांच्यासाठी महिलादिन असू शकतो. माझ्या जीवनात तरी असा दिवस अजून उजाडलाच नाही. जन्माला घालण्याच्या कृपेपासून कुठल्या ना कुठल्या रुपातल्या स्त्रीनेच संभाळ केला. म्हणून माझ्यासाठी प्रत्येक दिवसच महिलादिन असतो. तर कुठला एक दिवस साजरा करू? ज्यांच्या शुभेच्छा व सदिच्छांवरच जगलो व जगतो, त्यांना द्यायला उधारीच्या शुभेच्छा आणायच्या कुठून? ज्या दिवशी त्या दिवाळखोरीतून आणि ऋणातून मुक्त होऊ शकेन तो दिवस माझ्यासाठी स्वतंत्रपणे काही साजरे करायचा दिवस असेल मित्रांनो. पण विद्यमान निसर्गनियमात स्त्रीपासून स्वतंत्र स्वयंभू माणुस होणे या जन्मात तरी अशक्य वाटते. ...